Bhari Village (Yavatmal) : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे. बुधवारी (ता. 28) मोदींनी यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावातून नारीशक्ती आणि युवाशक्तीला साद घातली. बंजारा भाषेतून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. संबोधन सुरू करण्यापूर्वी मोदींच्या हस्ते विदर्भ-मराठवाडा रेल्वे प्रकल्पासह अनेक विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार भावना गवळी, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबद्दल कोणतेही संकेत देणे टाळले. बंजारा समाजाची बगडी आणि दुपट्टा घालत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदीतून भाषण करीत राज्यात सुरू असलेल्या विकास योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राला भरभरून निधी आणि योजना दिल्याबद्दल आभार मानले. अखिल विश्वात सर्वांधिक लोकप्रिय नेते म्हणून आज जग नरेंद्र मोदींकडे पाहात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदीतून उपस्थित बचत गटाच्या महिलांना संबोधित केले. महाराष्ट्रासाठी मोदी भरभरून देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात विकास कामांचे लोकार्पण होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 21 हजार कोटींच्या निधी वितरणासह अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण यावेळी मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आपण प्रधानसेवक म्हणून अनेक विषयांची ‘गॅरंटी’ दिलेली आहे. ही ‘गॅरंटी’ पूर्ण होण्याची ‘गॅरंटी’ लोकांना वाटत आहे. त्यामुळे आता ‘अबकी बार चारसौ पार’चे स्वप्न देशातील जनता नक्कीच साकार करेल.