अमरावती : अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे असे मेडिकल चालकाचे नाव आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केले.
शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकूने गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. त्याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ‘अटक केलेल्या आरोपींकडे हत्येचा हेतू स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करीत आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर ही हत्या या प्रकाराशी संबंधित असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले, असे उपायुक्त साळी यांनी म्हटले.
मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले. त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहाण करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद ( वय, २४ रा. मौलाना आझाद कॉलनी), मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम ( वय २२, रा. बिसमिल्लानगर ), शाहरूख पठाण हिदायत खान ( वय२४, रा. सुफियाननगर), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम ( वय, २४ रा. बिसमिल्लानगर ) आणि शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (वय २२, रा. यास्मीननगर ), या पाच जणांना अटक करण्यात आली.