अकोला : विद्याभारती तर्फे १९ ऑगस्टला देशभक्तीपर सामूहिक गीत गायन स्पर्धेचे आयोजन खंडेलवाल भवन येथे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भारताच्या वैभवशाली परंपरेशी एकरूप व्हावे असे आवाहन प्रमुख वक्ता मोहन मिश्रा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी केले. मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष माधवी कुळकर्णी, प्रमुख वक्ता मोहन मिश्रा, तारा हातवळणे, शरद वाघ, गोपाल वाघ, प्रा. जयश्री वैष्णव, शर्मिला देशमुख होते. दीप प्रज्वलन आणि विद्या भारतीच्या सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
पालकांनी मुलांना भारत भूमीशी जोडून संस्कार द्यावे. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे शिक्षण ग्रहण करून कर्तृत्व सिद्ध करावे. फक्त अभ्यास आणि मोबाईल मध्ये व्यस्त न राहता, पारंपरिक खेळ खेळण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कुटुंबाच्या सानिध्यात राहावे. उच्च शिक्षण घ्यावे तसेच आपल्या देशाचा इतिहास, थोर महापुरुषांच्या चरित्रांचे वाचन करावे. भारतभूमीसाठी ज्यांनी त्याग आणि बलिदान दिले त्यांना विसरता कामा नये असे मोहन मिश्रा म्हणाले.
गीतांचा परिणाम मनावर होतो . तरुणांच्या ओठांवर असलेल्या गीतांवरून त्यांच्यातील राष्ट्रभक्तीच्या भावनेची पारख होते. शैक्षणिक क्षेत्रात चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याच्या मुख्य उद्देशाने देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे विचार माधवी कुळकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
समारोप प्रसंगी मंचावर अध्यक्ष विठ्ठल खारोडे, प्रांत उपाध्यक्ष सचिन जोशी, महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्टचे ऋषिकेश अढाऊ, सुदेश काळपांडे, विक्रम जोशी आणी प्रमुख वक्ते महेंद्र कवीश्वर होते.
विद्या भारती ही राष्ट्रीयस्तरावर कार्य करणारी संघटना असून देशात शिक्षण पद्धती कशी असावी याचे उदाहरणांसह सादरीकरण विद्या भारतीने केले असून सरकारने ते स्वीकारल्याचे महेंद्र कविश्वर यांनी सांगितले. स्पर्धेत भाग घेतल्यावर अपयश आल्यास खचून जाऊ नये, कारण स्पर्धेत हरलेले अनेकजण टीव्ही तसेच सिनेमा क्षेत्रात पार्श्वगायन करतात. अश्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी तयार व्हावेत त्यांनी देशात नाव कमवावे या दृष्टिकोनातून विद्या भारती प्रयत्न करते असे कविश्वर यांनी सांगितले.
समूह गीत गायन स्पर्धा तीन गटात घेण्यात आली.
गट – अ
प्रथम – प्रभात किड्स स्कूल
द्वितीय – बाल शिवाजी प्राथमिक शाळा
तृतीय – आर.डी. जी. पब्लिक स्कूल
गट – ब
प्रथम – आर.डी. जी. पब्लिक स्कूल
द्वितीय – बाल शिवाजी प्राथमिक शाळा
तृतीय – विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल
गट – क
प्रथम – प्रभात किड्स स्कूल
द्वितीय – आर.डी. जी. पब्लिक स्कूल
तृतीय – खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल
समूह गीत गायन स्पर्धात सहभागी शाळा तसेच संगीत शिक्षकांना महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट गांधीग्रामचे ऋषिकेश अढाऊ व सुदेश काळपांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत ३२ शाळांच्या ४८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेच्या पर्यवेक्षक म्हणून अमरावतीच्या प्रा. जयश्री वैष्णव व प्रा. शर्मिला देशमुख यांनी काम बघीतले. विद्या भारतीचे गिरीश कानडे, अमृतेश अग्रवाल, मृणाल कुलकर्णी, श्रीदेवी साबळे, वृषाली जोशी, अंकिता दिवेकर, अंजली अग्निहोत्री, अमृतेश अग्रवाल, गोपाल राऊत, आसावरी देशपांडे, प्रांत सहमंत्री समीर थोडगे व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन योगेश मल्लेकर महानगर प्रमुख यांनी तर आभार प्रदर्शन शरद वाघ यांनी केले.