अकोला : दोन वर्षांच्या कालखंडानंतर संत श्री गजानन महाराज पालखीचे अकोल्यात आगमन झाले.’जय गजानन’,’श्री गजानन’,’गणगण गणात बोते’च्या घोषाने संपूर्ण महानगर दुमदुमले आहे.दोन दिवस पालखीचा मुक्काम शहरात आहे.
पालखीचे आगमन झाल्याने अकोलेकरांमध्ये मोठा उत्साह असून ठिकठिकाणी ‘श्रीं’च्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. खंडेलवाल शाळेतून पालखी कस्तुरबा हाॅस्पिटल, विठ्ठल मंदिर, वीर हनुमान चौक, लोखंडी पूल, सिटी कोतवाली, गांधी रोड, खुले नाट्यगृह मार्गे मुंगीलाल बाजोरीया विद्यालयाकडे शिस्तीत मार्गक्रमण करीत मार्गस्थ झाली आहे. घरांसमोर व चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या असून स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. विविध संस्थातर्फे पालखीचे पूजन करण्यात येत आहे. मुंगीलाल बाजोरीया विद्यालयात पालखीचा मुक्काम असेल. त्यानंतर आदर्श काॅलनी शाळा क्र.१६, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, श्री राजराजेश्वर मंदिरासमोरून जाऊन हरिहर पेठेत पालखी मुक्काम करेल. त्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.