Home » चंद्रपुरातील आंदोलनामुळे संतप्त होताहेत ओबीसी

चंद्रपुरातील आंदोलनामुळे संतप्त होताहेत ओबीसी

by नवस्वराज
0 comment

चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यापेक्षा स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे. ओबीसींच्या हक्कासाठी विदर्भातील चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केला आहे. त्यांच्या या आंदोलनाचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल माध्यमांवर चांगलेच गाजत आहेत. टोंगे यांनी पत्नी सुप्रिया आणि सहा महिन्याचा मुलगा अनिस यांच्यासह अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला आता पाच दिवस झाले आहेत. अशात टोंगे, त्यांची पत्नी व मुलासह सुरू असलेल्या आंदोलनाचे फोटो व व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

चिमुकल्या बाळासह टोंगे दाम्पत्य आंदोलन करीत असल्याने ओबीसी समाजात या आंदोलनाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: गेले होते. मात्र चार दिवसांपासून चिमुकल्यासह अन्नत्याग करणाऱ्या टोंगे दाम्पत्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या पोस्ट ओबीसी समाजात फिरत आहेत. टोंगे दाम्पत्याने सुरू केलेल्या या आंदोलनाची दखल काँग्रेसने घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जावे, त्यात काहीही गैर नाही; परंतु आपल्या सहा महिन्याच्या चिमुकल्यासह अन्नत्याग करणाऱ्या टोंगे दाम्पत्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही ही बाब संतापजनक असल्याचे वडेट्टीवार यानिमित्ताने म्हणाले.

टोंगे दाम्पत्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यासंदर्भात ओबीसी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ओबीसी समाजाकडुन सुप्रिया टोंगे आणि सहा महिन्यांच्या अनिस टोंगे यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अन्नत्याग आंदोलनामुळे सुप्रिया व अनिस यांचे आरोग्य ढासळु नये अशी प्रार्थना करणारे संदेश ओबीसी समाजाच्या समूहांमध्ये फिरत आहे. यासोबतच सरकारवर संताप व्यक्त करणाऱ्या संदेशांचाही यात समावेश आहे. भाजपा, ओबीसी जनगणना परिषद, भावसार समाज, तैलिक समाज, काँग्रेस ओबीसी सेल, जनविकास सेनेने टोंगे यांच्या आंदोलनस्थळाला आतापर्यंत भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे.

error: Content is protected !!