नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. केवळ महाराष्ट्रातच हे चित्र आहे असे नाही. देशातील नऊ राज्यांमध्ये सुमारे १२० वर्षांनंतर ऑगस्ट महिना कोरडा गेला आहे. हवामान विभागाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस यावर्षी पडला आहे. आतापर्यंत ७५ टक्के मान्सून संपला आहे.
देशातील महाराष्ट्रासह बिहार, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक, मणीपूर, केरळ, मिझोरम, दादर व नगर हवेली, दमण व दिव येथे ऑगस्ट पूर्णपणे कोरडा गेला आहे. दादर व नगर हवेली येथे तर ऑगस्ट १०० टक्के तर दमण आणि दिवमध्ये ८० टक्के कोरडा गेला आहे. देशातील पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालॅण्ड, त्रिपुरा येथेही परिस्थिती भीषण आहे.
देशाच्या समुद्री भागात अल निनो वादळ झाले. त्यामुळे मान्सूनवर यंदा चांगलाच परिणाम झाला. बंगालच्या उपसागरातून येणारे मान्सूनचे वारे उत्तरेकडे सरकले. मान्सून ट्रफ लाइनचे एक टोक हिमालयाच्या पायथ्याशी गेले. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी जास्त पाऊस झाला, तर उर्वरित भागात कमी पाऊस झाला. भारतात हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून येणारे मान्सून वारे सर्वाधिक पाऊस पाडतात. परंतु यंदा हे वारे कमकुवत ठरले. अल निनो गेल्या ६५ वर्षांत १४ वेळा प्रशांत महासागरात सक्रिय झाला आहे. त्यापैकी ९ वेळा भारतात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. ५ वेळा दुष्काळाचा परिणाम सौम्य होता.
मान्सूनने यावर्षी धोका दिल्याने देशातील ज्या बहुतांश तलाव, जलाशय आणि भूजलचे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसाने पुनर्भरण केले जाते, ते यंदा शक्य झालेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या दीड महिन्यात कमी पाऊस झाल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. कमी पावसामुळे महागाई वाढली की, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय रिझर्व्ह बँक व्याजदरात बदल करते. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतो.
भारतीय हवामान खात्याने ३१ ऑगस्ट रोजी नोंदविले की, ऑगस्ट २०२३ मध्ये १६२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ती सरासरी या महिन्यात होणाऱ्या पावसापेक्षा ३६ टक्के कमी आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात सामान्य पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सप्टेंबरमध्ये ईशान्य भारत, पूर्व भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि पूर्व-मध्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.