नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ओबीसींवर कोणत्याही स्थितीत अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली. ओबीसी व मराठा या दोन समाजात संघर्षाची ठिणगी उडेल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने आश्वस्त राहावे, असे फडणवीस म्हणाले. सरकार काही झाले तरी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही वा काढूनही घेतले जाणार नाही. याबाबत ओबीसींनी भीती बाळगू नये. ओबीसी समाजानेही या प्रकरणी कोणताही गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते सोमवारी नागपुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
दोन समाज समोरासमोर येतील असा कोणताही निर्णय घेणार नाही. विशेषतः असा प्रयत्न कुणीही करू नये असे मला वाटते. सगळ्या समाजातील नेत्यांनी कोणतेही स्टेटमेंट देताना इतर समाजही आपल्या समाजाचाच घटक आहे, याचा विचार करावा. त्यामुळे कुठलाही समाज दुखावणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. मराठा समाजाचे किंवा वेगवेगळ्या समाजातील प्रश्न कसे सोडवता येईल यावर विचार हाेईल. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्या इतर काही संघटनांचे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून यावर राजकारण न करता समाज हिताचा निर्णय कसा घेता येईल याचा विचार आम्ही करू, असे फडणवीस म्हणाले.
सरकारला कायद्याचा तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचाही विचार करावा लागत आहे. हा प्रश्न कायद्याच्या चौकटीतच सोडवणे गरजेचे आहे. समाज म्हणून कुणाचीही फसवणूक होऊ नये हे पाहणेही आवश्यक आहे. सगळ्यांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाशी बोलून असे प्रश्न निश्चितच सुटतील, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.