पुणे : ‘सगळेच माझ्यासारखे नसतात. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. निवडणुकीपूर्वीच काही लोकांनी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ असतील, मी त्यांना दोष देणार नाही’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी पवार यांनी म्हटले की, ‘सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. माझी सत्ता कितीतरी वेळा गेली आहे. १९८० मध्ये माझे सरकार बरखास्त झाले. रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी मला ही बातमी दिली. त्यानंतर मी तीन-चार लोकांना बोलावून मुख्यमंत्री निवासातील माझे साहित्य आवरले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. सरकारची गादी सोडली. त्यादिवशी मुंबईत इंग्लंड आणि भारत यांची क्रिकेट मॅच होती. ती मॅच पाहण्यासाठी मी सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडिअमवर गेलो आणि दिवसभर मॅच पाहण्याचा आनंद लुटला.’ सत्ता येते आणि जाते. त्यामुळे आपण इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही, असे पवार यांनी म्हटले.