अश्विन पाठक | Ashvin Pathak
Akola : राज्यपाल तथा महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या निर्णयानंतर राज्यातील विद्यापीठांवर नागपूरचा डंका कायम राहिला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या (SGBAU) कुलगुरूपदावर नागपूर येथील सीपी अॅन्ड बेरार कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमरावती विद्यापीठासह मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर उपराजधानीने डंका गाजविला आहे. अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. बारहाते हे गेल्या 12 वर्षांपासून नागपूरच्या सीपी अॅन्ड बेरार कॉलेजचे प्राचार्य आहेत. यापूर्वी ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य होते.
नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे (NUTA) नेते डॉ. अरविंद बारहाते यांचे ते सुपुत्र आहेत. नागपूर विद्यापीठात त्यांनी विविध प्राधिकारिणींवर काम केले आहे. सध्या मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदार ठाकरसे महिला विद्यापीठावर (SNTD) नागपूरच्या डॉ. उज्ज्वला चक्रदेव कुलगुरू आहेत. नागपूर विद्यापीठावर (RTMNU) डॉ. सुभाष चौधरी अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. प्रमोद येवले हे नागपूरकर कार्यरत होते. राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये कुलगुरू नसल्याने त्यांच्याकडेच या पदांचा अतिरिक्त प्रभार होता. डॉ. येवले अलीकडेच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोणतेही विद्यापीठ असो, त्यावर नागपूरचा डंका कायम आहे.
University News : नागपूरचे मिलिंद बारहाते अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू