अमरावती : अमरावती जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध पुन्हा एकदा रंगत आहे. यंदा आमने-सामने आहेत खासदार नवनीत राणा व काँग्रेसच्या नेत्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर. राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री, काँग्रेस नेत्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यावर खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांचा ठाकूर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
काँग्रेसने अमरावती जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढली. या यात्रेत यवतमाळच्या महिला शेतकरी कलावती बांदुरकरही सहभागी झाल्या होत्या. या यात्रेवर टीका करताना खासदार नवनीत राणा यांनी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अॅड. ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याकडुन पैसे घेतले, परंतु प्रचार मात्र दुसऱ्याचा केला, असा आरोप खासदार राणा यांनी केला. खासदार राणा यांच्या या आरोपांचा आमदार अॅड. ठाकूर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
राणा दाम्पत्यावर हल्ला करताना अॅड. ठाकूर यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. ‘रवी राणा तू चोर आहे. तुझी बायको चोर आहे..’ असा तीक्ष्ण शाब्दीक हल्ला करीत आमदार अॅड. ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले. पैसे घेतल्याचे आरोप सिद्ध करून दाखवा अन्यथा राजकारणातून संन्यास घ्या, असे त्यांनी निक्षुन सांगितले. कोणतेही बिनबुडाचे आरोप सहन करणार नाही असा थेट ईशाराच आमदार अॅड. ठाकूर यांनी राणा दाम्पत्यास दिला. ‘आम्ही ताईंचा वहिनी म्हणून स्वीकार केला. त्यांना निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. परंतु त्यांचे प्रमाणपत्रच खोटे निघाले’, असा प्रतिहल्ला अॅड. ठाकूर यांनी राणांवर केला. ‘राणा या चोर निघाल्या. त्यामुळे त्यांनी आपल्या औकातीत राहावे’, अशा शब्दात टिका करीत अॅड. यशोमती ठाकूर यांनी राणांना आपली जागा दाखवून दिली.
अमरावती जिल्हा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वादंगामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. राणा दाम्पत्याचे आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांशी वाद झाले आहेत. अलीकडेच प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात मोठा शाब्दीक वाद रंगला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा वाद शांत करण्यासाठी मध्यस्थी करावी लागली होती. आता खासदार नवनीत राणा यांनी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नवे वादळ निर्माण झाले आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची सध्या केंद्रात व राज्यात भाजपशी चांगलीच जवळीक आहे. अशात स्वत:च्या जिल्ह्यातच राणा दाम्पत्य विविध राजकीय प्रतिस्पर्धी निर्माण करीत आहेत. त्यातही अनेकांशी असलेले हे वाद विकोपाला जात आहे. परिणामी राणांनी पंगा घेतलेले सर्व विरोधक एकत्र येत त्यांना कोंडीत कसे पकडता येईल, याच्या प्रतीक्षेत असल्याची अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.