Home » आमदार राणा म्हणाले बच्चू कडू म्हणजे ब्लॅकमेलर

आमदार राणा म्हणाले बच्चू कडू म्हणजे ब्लॅकमेलर

by नवस्वराज
0 comment

अमरावती : लोकसभा निवडणुकीत कुणी पैसे वाटले व कुणी पैसे घेतले याची चौकशी होणे गरजेचे आहे. आपण यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले होते. कडू यांच्या या वक्तव्यानंतर आमदार राणा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या खासदार रवी राणा व काँग्रेस नेत्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यात राजकीय वाद पेटला आहे. उद्धव ठाकरे गट आणि आमदार रवी राणा यांच्यातही हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचले आहे. अशात प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचा आमदार रवी राणा यांची समाचार घेतला. त्यामुळे आमदार राणा व आमदार कडू यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार बच्चू कडू म्हणजे मंत्रीपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करणारा नेता असल्याची टीका आमदार राणा यांनी केली आहे. ‘मला आवर घालण्याचा सल्ला देण्यापेक्षा बच्चू कडू यांनी स्वत:ला आवर घालावी’, असे आमदार राणा म्हणाले. भाजपसोबत असलेल्या आमदार रवी राणा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर घालावी असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला. त्यावर आमदार राणा चांगलेच संतापले. ‘’देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी गेली ११-१२ वर्षांपासून आहे. ते सरकारमध्ये असताना आणि विपक्षमध्ये असतानाही मी त्यांच्यासोबत होतो. आम्ही दुःखात सुखात सोबत राहणारे व्यक्ती आहोत. पळ काढणारे नाही. बच्चू कडू यांनी जो सल्ला दिला आहे. जे नेहमी पाला बदलत असतात त्यांनी सल्ला देण्याचं काम करू नये’, अशी टीका राणा यांनी केली. निवडणूक जवळ आल्यानंतर सगळे नेते एकत्र येऊन आपल्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण जनतेच्या मनात राहतो. जनता आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपला नेहमीच विजय होतो, असेही राणा यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने खऱ्या अर्थाने बच्चू कडू यांना आवर घालण्याची गरज आहे. त्यांना केवळ मंत्रीपद हवे आहे, हे त्यांच्या बोलण्यावरून व वागण्यावरून स्पष्ट दिसते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे मंत्रीपदासाठी किती अधीर झाले आहेत, याची कल्पना येते. त्यामुळे खऱ्या अर्थाने बच्चू कडू यांना आवर घालण्याची गरज असल्याचे आमदार राणा म्हणाले. आपल्या विरूद्ध आतापर्यंत अनेक कट-कारस्थाने झालीत. परंतु आपण कुणालाही घाबरत नाही, असे राणा यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!