मुंबई : आमदार देवेंद्र भुयार यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही आमदाराचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. मी आज सकाळी त्यांना पहाटे पाच वाजता भेटीसाठी फोन केला होता. त्यांनी मला लगेच भेटीसाठी ७.४५ ची वेळ दिली, असे देवेंद्र भुयार यांनी सांगितले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र भुयार यांनी अपक्ष आमदारांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या संजय राऊत यांच्या आरोपांचा इन्कार केला. अपक्ष आमदारांवर कायम अविश्वास दाखवायचा, हे योग्य नाही. मी अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यसभा निवडणुकीत मतदान केले. शिवसेनेची भूमिका अशीच राहिल्यास भविष्यात तुमच्यासोबत राहायचे की नाही, याचा विचार करु, असा इशारा भुयार यांनी दिला होता. पण यानंतर त्यांनी यावर सारवासारव केली. मी भाजपसोबत जाणार नाही, असे ते म्हणाले.