मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे नाराज असलेले आमदार बच्चू कडु यांच्यासाठी बुधवार, २४ मे २०२३ रोजीचा दिवस गोड बातमी घेऊन आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बच्चू कडु यांना मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सर्वप्रथम आमदार बच्चू कडु यांनीच प्रतिक्रिया दिली होती. २४ ते २६ मे दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होईल असे त्यांनी सांगितले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार या दिवशी झाला नसला तरी आमदार कडू यांना मात्र मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून आमदार कडू हे मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत होते. त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. आमदार बच्चू कडू हे राज्याच्या दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष आहेत. या पदाचा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
सुमारे २० वर्षांपासून आमदार बच्चू कडू हे दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याचे फलित म्हणून महाराष्ट्रात दिव्यांग कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचे अध्यक्षपदही आमदार कडु यांच्याकडेच आहे. आता याच अध्यक्ष पदाला मंत्र्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडु यांची नाराजी घालविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. अशात आमदार बच्चू कडू यांची नाराजी वाढत जाऊ नये म्हणून हा सुवर्णमध्य सरकारने शोधल्याचे सांगण्यात येत आहे.