अमरावती : अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या दोन महिला नेत्यांच्या वादात आता प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याशी आधीच मतभेद असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा विरुद्ध अॅड. यशोमती ठाकूर यांच्या वादाचे मूळ कारण शोधुन काढण्याची मागणी केली आहे.
आमदार रवी राणांकडुन अॅड. ठाकूर यांनी कडक नोट घेतल्या पण लोकसभा निवडणुकीत प्रचार दुसऱ्याचाच केला, असा थेट आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. यावर राणा दाम्पत्याने निवडणूक काळात पैसे वाटल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिलीय. परिणामी निवडणूक आयोगाने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी अॅड. ठाकूर यांनी केली. यासंदर्भात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी खासदार राणा व आमदार अॅड. ठाकूर या दोघांचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. ‘कुणी किती पैसे दिले व कुणी किती पैसे घेतले, हे जनतेसमोर आलं पाहिजे’, असं आमदार कडू म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जर असे काही झाले असेल तर मुळात ते चुकीचे आहे. सर्वप्रथम अशा प्रकारे पैसे देणारा चुकीचा आहे, असे आमदार कडू म्हणाले. यासंदर्भात पोलिय आयुक्तांकडे आपण तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी गरजेची झाली आहे. केवळ आरोप-प्रत्यारोपांनी काहीही सिद्ध होणार नाही, असे कडू म्हणाले.
नवनीत राणा आणि अॅड. यशोमती ठाकूर यांच्यातील हा राजकीय वाद दिवसेंदिवस वाढत आहे. चोर, गोरी चमडी, औकात, बाप काढण्यापर्यंत हा वाद वाढला आहे. अशात आमदार बच्चू कडू यांनीही या वादात उडी घेतली आहे. अमरावती जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचा प्रकार नवा नाही. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्यातील राजकीय वाद तर कोर्टापर्यंत गेला आहे. आमदार सुलभा खोडके व आमदार रवी राणा यांच्यातील मतभेदही सर्वश्रुत आहेत. अलीकडेच आमदार बच्चू कडू व आमदार राणा यांच्यात कलगीतुरा रंगला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती. या वादाच्या मालिकेत आता आमदार अॅड. यशोमती ठाकूर नावाचीही भर पडली आहे.