नागपूर : महाराष्ट्रात होत असलेल्या दंगलींबाबत वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इतक्या औरंग्याच्या औलादी आल्या कुठून’, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता. त्यानंतर आता या विषयावर वनमंत्री मुनगंटीवारही आक्रमक झाले आहेत.
मध्य प्रदेशमधील इंदौर येथे ८ जून २०२३ रेाजी मोदी @9 साठी आयोजित पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी असामाजिक तत्त्वांना निर्वाणीचा इशारा दिला. सद्यःस्थितीत औरंगजेबाच्या दृष्ट बुद्धीचे उदात्तीकरणे सत्तेसाठी केले जात आहे. तेच राजकीय पक्ष दंगलीसाठी जबाबदार आहेत. तुम्ही औरंगजेबाचे फोटो झळकवाल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही काय केवळ निवेदन देऊन गप्प बसू का, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
औरंगजेब मुस्लीम आहे. हा भाव कुणीही मनात आणू नये. तो मुस्लीम होता की कुण्या अन्य धर्माचा, हा प्रश्नच नाही. औरंगजेब अत्याचारी होता. त्याने बापाला जेलमध्ये टाकले, भावाला मारले, हिंदूच नाही, तर मुस्लीम बहीणींवरही अत्याचार करण्याची परवानगी त्याने दिली होती. संभाजी महाराजांना ४० दिवस यातना देऊन त्यांचा अनन्वित छळ केला. गरम सळाखींनी त्यांचे डोळे फोडले, चामडी सोलली. अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रातच नव्हे तर कुठेही चालणार नाही, असा सणसणीत ईशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.