मुंबई : दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अरबी समुद्रात रेंगाळले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सून थांबला. आता मान्सून मार्गी लागेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मान्सून अद्याप विदर्भात आलेला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस झाला होता. हा पाऊस मान्सूनपूर्व नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आता कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. मान्सून 16 मे रोजी अंदमानात दाखल झाल्यानंतर 29 मे रोजी तो केरळात दाखल झाला. कर्नाटकपर्यंत मान्सूनची वाटचाल योग्य वेळेतच सुरु होती. मात्र अचानक मान्सूनचा प्रवाह कुमकुवत झाल्याने तो कर्नाटकातच थांबला. असे असले तरी यंदा चांगला पाऊस होईल असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.