Nagpur : हिवाळा संपत आला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. प्रत्येक वस्तूचे दर वाढतांना दिसतात. ऊसाचा रस असो किंवा लिंबू सरबत उन्हाळ्यात तापमानत वाढ झाली की हे दोन शीतपेय जास्त पिले जातात. त्यामुळे यांची मागणी बाजारात जास्तच असते. 15 रुपयाला 1 लिंबू या प्रमाणे विक्री होत आहे. विक्रम मोडीत काढत लिंबाची भाववाढ सुरूच आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे लिंबू विकले जात असून किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी 300 ते 350 रुपये मोजावे लागत आहेत. एरवी कमी भावात विकल्या जाणाऱ्या लिंबांना यावेळी सफरचंदाच्या तोडीचा भाव मिळत आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना या भाव वाढीचा फायदा होऊ शकतो.
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहाता या भागात मोठ्या संख्येने लिंबाच्या बागा आहेत. तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाचे लिलाव मोठ्या प्रमाणावर होतो. यावर्षी उन्हाळ्यापूर्वीच लिंबाचे भाव वाढण्यास सुरवात झाली आहे . जानेवारी मध्ये 100 रुपये किलो दरम्यान असलेले भाव आता शंभरीच्या पुढे गेले आहेत. मागील काही काळापासून उन्हाचे चटके बसत आहे. तशी लिंबाची मागणी आणि भावही वाढत आहेत. तुलनेत यंदा उत्पादन कमी असल्यामुळे भाववाढीला चालना मिळत गेली. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्चही वाढत असल्याचा परिणामही लिंबाच्या भावावर होत आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लिंबाचं उत्पादन घेतलं जाते. मात्र, काही वेळाला हवामानातील बदलाचा मोठा फटका लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. सध्या राज्यात काही भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा फटकाही लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या बाजारपेठेत लिंबू पाठवली जातात. आंध्र प्रदेश सर्वात जास्त लिंबाचे उत्पादन करणारे राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. सद्यःस्थितीत दिल्लीत 5 हजार ते 7 हजार रुपये क्विंटलचा दर आहे. नागपूरच्या कळमना बाजारात लिंबू आवक अवघी 15 ते 20 क्विंटल आहे. त्यामुळेच दर तेजीत आहेत. अमरावतीच्या फळ व भाजीपाला बाजार समितीत लिंबू आवक 10 क्विंटल राहिली. ठिकाणी दर 1 हजार 800 ते 2 हजार रुपये इतके आहेत. पुढील काळात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर हे दर वाढतील, अशी अपेक्षा व्यापारी सूत्रांकडून वर्तविली जात आहे.