अकोला : जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने अकोल्यात पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाने शुक्रवारी सकाळपासूनच निदर्शने, आंदोलन, निवेदन असा क्रम चालविल्याने सायंकाळी उशिरापर्यंत अकोल्यातील बाजारपेठ बंद होती. बंदमुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प होते.
शुक्रवारी सकाळपासूनच अकोला जिल्ह्यातील दुकाने, शाळा, बाजार, एसटी, पेट्रोल पंप सर्वंच बंद होते. जिल्ह्यातील अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. अकोला शहरातील पोलिस पेट्रोल पम्प वगळता सर्व पेट्रोल पम्प बंद होते. विविध संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्याने हा बंद कडकडीत ठरला. अकोला शहरातील दुकाने, शाळा, बाजार, एसटी, पेट्रोल पंप सर्वंच बंद ठेवण्यासाठी शांततामय मार्गाने विनंती करण्यात आली. मराठा समाजाच्या आंदोलकांनी स्वराज भवनजवळ एकत्र येत निदर्शनेही केली.
बंदच्या पार्श्वभूमिवर अकोला जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील अनेक चौकांमध्ये पोलिसांना स्थायी स्वरुपात तैनात करण्यात आले होते. जिल्हाभरात बंद पुकारण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळानेही अनेक बसफेऱ्या रद्द केल्या. लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या खामगावमार्गे वळविण्यात आल्या होत्या. बंदला अकोल्यातील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडीसह सर्व राजकीय पक्ष, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रिज, सराफा असोसिएशन, हॉटेल्स, धान्य व्यापारी, किराणा बाजार असोसिएशन, व्यापारी आडतीया संघटना, ग्रेन मर्चंट असोसिएशन, पेट्रोल पम्प असोसिएशन, बांधकाम व्यवसायिक संघटना, आयएमए , इंजिनिअरिंग अॅन्ड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, चर्मकार फोर प्लस ग्रुप आदीचा पाठिंबा होता.