अकोला : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने अकोल्यात आंदोलन करण्यात आले.
शनिवार, २ सप्टेंबर २०२३ दुपारी एक वाजताच्या सुमारास अकोल्यातील मराठा समाजातील राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध नोंदवित रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
माजी मंत्री गुलाबराव गावंडे, संग्राम गावंडे, राजेश मिश्रा, लक्ष्मण पंजाबी, सुनिल दुर्गिया, मुन्ना मिश्रा, रोशन राज आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले. जालन्यातील लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर अकोल्यातील मराठा समाजात त्याचे पडसाद उमटतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे अकोला पोलिसांनी संभाव्य आंदोलनाच्या दृष्टीने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता.