Nagpur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली. 80 टक्के जागावाटप पूर्ण झाले असून, 20 टक्के जागांबाबत आम्ही तिघेही प्रत्यक्ष बैठक घेऊन किंवा दूरध्वनीवर चर्चा करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च रोजी प्रसारमाध्यमांना दिली.
शुक्रवारी 8 मार्च रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीतबाबत फडणवीस म्हणाले की, भाजपा कोणत्या जागा लढवणार आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांना कुठल्या जागा देणार याबाबत 80 टक्के सहमती झाली आहे. उर्वरित 20 टक्के जागांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. सर्वच निर्णय एका बैठकीत होत नाहीत. त्यामुळे चर्चा आणि विचार विनीमय करून महाराष्ट्राची यादी जाहीर केली जाईल. वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रकाश आंबेडकर कधी काय बोलणार, याबाबत मी काय सांगू शकतो ? देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
भाजप आणि मनसेची भूमिका सुसंगत
भाजपने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संदर्भातील भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मनसेने घेतलेली व्यापक भुमिका आमच्या विचारांशी विसंगत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणे योग्य असून, क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. मी मनसेसोबत युतीचे कुठलेही संकेत दिलेले नाहीत, हे प्रसार माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.