अकोला : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ४ सप्टेंबर रोजी विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
शासकीय शाळांप्रमाणे खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावा, अल्पसंख्यांक शाळांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी, शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावी, शिक्षक भर्तीसाठी पवित्र पोर्टल रद्द करून संस्थास्तरावर पदभरतीचे अधिकार द्यावे, अनुदानित शाळांचे वीज देयक व शासनाकडुन आकारला जाणारा ईमारत कर रद्द करण्यात यावा. मुख्याध्यापकांना ऑनलाईन कामांसाठी लॅबटॉप देण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शिक्षणाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मनीष गावंडे यांच्या नेतृत्वात अमित शिरसाट, मोहम्मद अतीक, अलकेश खेडकर, मोहम्मद जावेदुजम्मा, प्रमोद गाटे, अविनाश मते, नरेंद्र चिमणकर, कैलास सुरडकर, नितीन दिवनाले, संतोष गावंडे, दत्ता अमानकर, सचिन अरबाळ, सचिन लाखे, वसीम मुजाहिद, अमोल वानखडे, मिलिंद कराळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षकांच्या या आंदोलनस्थळाला सनातन संस्कृती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही भेट दिली. शिक्षकांच्या मागण्या न्यायपूर्ण असून या आंदोलनाला महासंघाने पाठिंबा दिला.