अकोला : वादळ किंवा जोरदार पाऊस असल्यास वीज पुरवठा खंडीत होणे सहाजिक आहे. परंतु अशी कोणतीही परिस्थिती नसताना गेल्या एक महिन्यापासून अकोला महानगरातील अनेक भागात दिवसातून किमान दोन ते चार वेळा वीज पुरवठा खंडीत होतो. महावितरणतर्फे अघोषीत भारनियमन तर राबविण्यात येत नाही ना? असा प्रश्न वीज ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे.
विजेच्या लपंडावामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. याची झळ सर्वांत जास्त जुने शहराला सोसावी लागते. विजेचा वापर उन्हाळ्यात वाढतो. आताच जर अशी परिस्थिती आहे ,तर पुढे काय होणार याची धास्ती ग्राहकांनी घेतली आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे महानगरा लगतची काही गावे महानगरपालिका क्षेत्रात आली आहेत. पूर्वी महावितरण कंपनीच्या ग्रामीण विभागाअंतर्गत असलेले अनेक वीज ग्राहक शहर विभागात समाविष्ट झाले आहेत. कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता काही ग्राहकांना त्यांच्या जुन्या तक्रार निवारण केंद्रातून, नवीन केंद्रात वर्ग केले. विजेसंबंधित समस्या निर्माण झाल्यास ग्राहकांना तक्रार देण्यासाठी आपण कुठल्या तक्रार निवारण केंद्राअंतर्गत येतो याचा शोध घेण्यासाठी धावपळ करावी लागते.
‘नवस्वराज’ने ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबद्दल पूर्वी देखील प्रकाश टाकला आहे. कंपनी वीज गळती आणि वीज चोरी यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे कंपनीला वेळोवेळी दरवाढीचा प्रस्ताव सादर करावा लागतो. पुरवठा आणि मागणीचा मेळ बसावा म्हणून भारनियमन राबवावे लागते. वीज देयक वसुलीबाबत देखील नगण्य रक्कम असलेले आणि नियमित देयक भरणाऱ्या ग्राहकांना वेठीस धरले जाते. याचा त्रास प्रामाणिक वीज ग्राहकांना होतो. महावितरण कंपनीने या बाबींकडे लक्ष द्यावे तसेच महानगरात सुरू असलेले अघोषित भारनियमन बंद करून ग्राहकांना दिलासा द्यावा.