Latur : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झालेत. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी (3 मार्च) पहाटे घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई हे चौघे तरुण स्विफ्ट डिझायर कारने तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.
चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात कार आली असता, कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून जात असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरक्ष: चुराडा झाला. या भीषण अपघातात मोहन बालाजी कोतवाल (वय 27) शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय 26) कृष्णा विठ्ठल मंडले (वय 24) आणि नर्मन राजाराम कात्रे (वय 33) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी होते. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.