Amravati Tension : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमनेसामने आलेत. गेल्या पाच दिवसांपासून खानापूर गावच्या प्रवेशद्वाराचा वाद सुरू आहे. यावरून स्थानिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी गावात संचारबंदी लागू केली होती. मात्र संचारबंदी झुगारून मोठ्या संख्येने आंदोलक अमरावतीत पोहोचले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात काही पोलिस जखमी झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानापूर गावात कमान उभारण्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अशात सोमवारी (ता. 11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या बंबातून दगडफेक करणाऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कमानीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या नागरिकांची भेट घेतली होती. मात्र आंदोलकांनी लेखी स्वरुपात परवानगी देण्याची मागणी केली होती. परवानगी देण्यासाठी व हा वाद सोडविण्यासाठी प्रशासनाने वेळ मागून घेतली होती. अशातच सोमवारी अमरावती शहरात हिंसक आंदोलन झाल्याने तणाव वाढला आहे.
जमावाने महसूल विभागाच्या कार्यालयाचे फाटक तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविल्याने तुफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांना लाठीहल्ल्याचा आदेश द्यावा लागला. लाठीहल्ल्यानंतर जमाव पांगल्याने त्यांनी सापडेल त्या दिशेने दगडफेक केली. अशात पाण्याचा मारा करून जमावावर नियंत्रण मिळवावे लागले. दगडफेकीच्या घटनेनंतर मोठा पोलिस ताफा शहरात तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे.