पुणे : महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार यावर्षी जम्मू येथे कार्यरत ‘अदिती प्रतिष्ठानच्या’ किलांबी पंकजा वल्ली यांना प्रदान कारण्यात आला. मूळच्या तामिळनाडूतील असलेल्या पंकजा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी गेल्या २५ वर्षांपासून काम करत आहेत. ‘राष्ट्रीय एकात्मतेच्या’ दृष्टीने या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना अत्यंत आदरपूर्वक बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांच्या हस्ते बाया कर्वे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. एक लाख एक हजार रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संघटनेने या भागात काम करण्यास पाठविले. माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करणे हे माझे कर्तव्यच आहे, असे पुरस्कार घोषित होताच, अत्यंत नम्रपणे त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, संघटनेप्रति त्यांची असलेली समर्पणाची भावना दर्शविणारी आहे.
१२५ वर्षापूर्वी भारतरत्न महर्षी कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या शताब्दी वर्षापासून म्हणजेच १९९६ पासून सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘बाया कर्वे पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. दहशतवादी हल्यात अनाथ झालेल्या मुलांना मायेची उब देत त्यांना सांभाळणाऱ्या व या मानवतेच्या कार्यातून ‘राष्ट्रीय एकात्मते’ चा संदेश देणाऱ्या पंकजा यांचा यावेळी परिचय करून देण्यात आला.