Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहरात शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी मुलाखतीदरम्यान त्यांच्या गळ्यात असणाऱ्या वाघाच्या दाता संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिले होते. ते म्हणाले की, ‘माझ्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे. या वाघाची 1987 मध्ये मी शिकार केली होती.’ ज्याची शिकार केली तो वाघ होता की बिबट्या असे विचारले असता, गायकवाड म्हणाले, ‘वाघच… बिबट्या वगैरे तर मी असेच पळवतो.’ गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वन विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली. आपल्याच वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत बुलढाणा वन विभागाने त्यांच्या गळ्यातील तो दात सदृष्य वस्तू जप्त केली. ती वस्तू डेहराडूनला तपासणीसाठी पाठविण्यात आली. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. जप्त करण्यात आलेली वस्तू वाघाचा खरा दात नसून प्लास्टिकचा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेहमीच वादग्रस्त विधान
वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेच्या वर्तुळामध्ये राहणारे संजय गायकवाड हे वाघाच्या दातामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खोटी महिती दिल्याने स्वतःचीच फजिती करुन घेत ते राजकीय वर्तुळात चर्चा आणि हास्याचा विषय झाले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी आपण स्वत: वाघाची शिकार केली असून, त्याचा दात गळ्यात घातल्याचे वक्तव्य केले होते. संजय गायकवाड हे विदर्भातील आमदार आहेत. सामाजिक माध्यामांवर फिरत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, आमदार असे म्हणताना दिसले की त्यांनी 1987 मध्ये वाघाची शिकार केली होती. ‘हा त्याच वाघाचा दात आहे. मी त्याची शिकार केल्यावर तो (दात) काढला होता. तेव्हापासून मी तो माझ्या गळ्यात घातला आहे.’ आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळेे खळबळ उडाली होती. वन विभागाने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली होती. संबंधित दातसदृश वस्तू वन विभागाने आपल्या ताब्यात घेऊन डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट मध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविली होती. तेथून यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर आता तो दात प्लास्टीकचा असून, वाघाचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.