अकोला : अकोला महानगरपालिका वर्ष २००१ मध्ये अस्तित्वात आली. त्यानंतर महापालिकेत सत्तांतरे झाली, परंतु अकोलेकर मात्र कायम विकासा पासून वंचित राहिले आहेत. यासाठी नागरीक देखील तितकेच दोषी आहेत, त्यांनी सुशिक्षित, सुसंस्कृत, विकासाची दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती असणाऱ्यांना निवडून देण्याऐवजी खुर्च्या, माईक, पोडीयमची फेकफाक, तोडफोड करणारे, राजदंड पळवणार्यांना पसंती दिली. अर्थात याला काही अपवाद आहेतच. परंतु अशा वातावरणामुळे चांगले लोक पुढे येण्यास धजावत नाहीत. विकासशुन्य महानगर अशी अकोल्याची ख्याती आहे.
महानगरपालिकेची दोन रूग्णालये आहेत, डाबकी रोड वरिल कस्तुरबा आणि टिळक मार्गावरील श्रीमती किसनीबाई भरतीया, अशोक नगर मधील आयुर्वेदिक आणि बी आर हायस्कूल समोरील होमिओपॅथीक अशी दोन दवाखाने, छत्रपती शिवाजीनगर मधील बंद झाला आहे. दोन्ही रूग्णालये व दवाखाने मरणासन्न स्थितीत आहेत. महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थिक संकल्पाच्या ३% रक्कम आरोग्य विभागावर खर्च करावी असा शासन निर्णय आहे. अर्थसंकल्पात नावापुर्ती तरतुद केली जाते, औषधी खरेदी वगैरेवर कुठलाही खर्च करण्यात येत नाही. भरतीया रूग्णालयाचा कारभार बीयुएमएस ( बॅचलर ऑफ युनानी मेडीसिन अँड सर्जरी ) झालेला डाॅक्टर बघतो. कस्तुरबा मधे पूर्णवेळ डाॅक्टर नाही. महानगरात शासनाच्या पुर्ण सहाय्याने चालवण्यात येत असलेले एकूण १० अर्बन हेल्थ सेंटर आहेत, महानगरपालिका केवळ त्यावर देखरेख करते, त्यातील एका डाॅक्टरकडे कस्तुरबाचा अतिरिक्त पदभार आहे. दोन्ही रूग्णालयात कर्मचार्यांची वानवा आहे. रूग्णालये शोभेच्या वस्तू झाल्या आहेत.
अनेक शहरात महानगरपालिकेची मल्टीस्पेशालीटी रूग्णालये आहेत, ज्यात दुर्धर रोगांवर उपचार तसेच कठीण शस्त्रक्रिया होतात. ज्याचा लाभ फक्त आपल्या राज्यातीलच नव्हे तर दुसऱ्या राज्यातील रूग्ण देखील घेतात. महानगरपालिकेची स्वतः ची एकही रुग्णवाहिका नाही. कोरोना काळात रूग्णांची वहातूक सिटीबस मधून करावी लागली, अकोलेकरांचे यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते. मृतावस्थेत असलेल्या महानगरपालिकेच्या दोन्ही रूग्णालयांना नवसंजीवनी मिळेल का? ते अद्ययावत होतील का? सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी पुढाकार घेऊन कोणी प्रयत्न करेल का? अशे प्रश्न नागरीकांना भेडसावत आहेत.