अकोला : विद्यार्थी अभ्यास करत असताना दिवसातून पाच वेळा वाजणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांमुळे तसेच अन्य लोकांकडून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाने केली आहे.
या संदर्भात सुराज्य अभियानाच्या वतीने महाराष्ट्राच्या गृहमंत्री कार्यालयास निवेदन पाठवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच गायक सोनू निगम यांनी मशिदींवरील भोंग्याद्वारे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत आवाज उठवला होता. मात्र, तत्कालीन शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक टाळली होती. आता केंद्र आणि राज्यात समाजघटकांचे हित पाहणारे शासन आहे.
त्यामुळे शासनाने अशा ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाचे समन्वयक डॉ. उदय धुरी यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. प्रत्येक मशिदीत दिवसातून पाच वेळा भोंगे वाजतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत. प्रथम किमान परीक्षा काळात भोंगे बंद करावेत. त्यानंतर अनधिकृतपणे आणि ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ओलांडणाऱ्या सर्वच मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.