अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर विदर्भातील नागरिकांना आता तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमान आता ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे विदर्भात सर्वत्र तीव्र उष्णतेची लाट येण्याचा ईशारा भारतीय मौसम विभागाच्या नागपूरस्थित प्रादेशिक वेधशाळेने दिला आहे.
वर्धा आणि अकोला जिल्ह्यात तापमान झपाट्याने वाढत आहे. पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्याचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे तापमान गारठले होते. आता मे महिन्याच्या मध्यात सूर्य तळपायला लागला आहे. उत्तरेकडून उष्ण वारे विदर्भात येत आहेत. विशेषत: राजस्थानच्या पट्ट्यात उष्णता वाढत आहे. त्यामुळे गरम वाऱ्यांचे वादळ आता कोणत्याही क्षणी विदर्भात प्रवेश करेल असे सांगण्यात येत आहे.
राजस्थान आणि उत्तरेकडील भागात तापमानवाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भातही सर्वत्र तापमानात अचानक वाढ झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. आता विदर्भीयांना संपूर्ण मे महिना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये तापमानाने चाळीशीचा पार गाठला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा नावाच्या चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळं वायेव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा वेग वाढल्याने तापमानात एकाएकी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून विदर्भासह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या या परिस्थिती सकाळपासूनच अकोला आणि नागपूरकरांना कडक उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे.