BJP News : आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी आपली दावेदारी दाखल केली आहे. बुधवारी (ता. 20) त्यांनी यासंदर्भातील भावना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमक्ष व्यक्त केल्या. आमदार शर्मा यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपमधून या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. अशात गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाला अकोल्यात मोठे करण्यात मोलाचे योगदान प्रदान करणाऱ्या गिरीश जोशी यांनी आता भाजपने त्यांना आमदारकीसाठी (MLA) संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
एकाच पदावर काम
गिरीश जोशी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत. पक्षातील सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचे मधूर संबंध आहेत. स्वत:च्या प्रसिद्धीपेक्षा जोशी यांनी अकोला जिल्ह्यात भाजपचा प्रचार-प्रसार केल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अकोल्याच्या भाजपमध्ये अनेक नेतृत्व बदल झालेत. परंतु जोशी यांचा कधीही कुणाशीही वाद झाल्याचे ऐकिवात नाही. कोणत्याही गटबाजीच्या भानगडीत न पडता त्यांनी पक्षाची जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी होईल यावरच जोर दिला. त्यामुळेच त्यांना महानगर व ग्रामीण दोन्हीचे प्रसिद्धी प्रमुख पद देण्यात आले.
आमदार गोवर्धन शर्मा यांना पक्षाने नगरसेवक पदापासून विधानसभेपर्यंत संधी दिली. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्याला मोठा करणारा पक्ष म्हणून अकोल्यात भाजपकडे पाहिले जाते. अशात गिरीश जोशी यांच्यासारख्या कार्यकर्त्याला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास भाजपकडून वेगळा संदेश जाणार आहे. पक्षाने संधी दिली, नाही दिली तरी कोणताही किंतु, परंतु मनात न बाळगता मिळेल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचा शब्द गिरीश जोशी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिला आहे.
दोनदा नगरसेवक
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस असे सर्वच मोठे पक्ष या मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत आहेत. अशात भाजपकडून अद्याप कोणत्याही नावाची घोषणा झालेली नाही. या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा असलेल्यांची संख्या इतर पक्षाच्या तुलनेत भाजपमध्ये जास्त आहे. अशात गेल्या 32 वर्षांपासून प्रसिद्धी प्रमुख पदावर काम करणाऱ्या जोशी यांनी संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जोशी हे अकोला महापालिकेत दोनदा स्वीकृत नगरसेवकही होते. त्यामुळे गोवर्धन शर्मा यांच्यानंतर जोशी यांना भाजप लालाजींप्रमाणे ‘कार्पोरेटर टू एमएलए’ची संधी देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.