अकोला : गवळी समाजाचे नेते व बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांडातील दोन संशयित आरोपींना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. धीरज प्रल्हाद गावंडे व सूरज प्रल्हाद गावंडे ही आरोपींची नावे आहेत.
२०१९ मध्ये गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांचा अकोल्यातील सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाच्या परिसरात भरदिवस खून करण्यात आला होता. प्रवीण हुंडीवाले यांच्या तक्रारीच्या आधारे सिव्हिल लाईन्स पोलिसांनी गुन्हा नोंदवित १३ जणांविरुद्ध कारवाई केली होती. तेव्हापासून धीरज व सूरज जिल्हा कारागृहात होते. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या खटल्यात सरकारची बाजू मांडत आहेत.
सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिवक्ता नीतेश गुप्ता, मनोज गोरकेला यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. सरकारतर्फे मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर गावंडे बंधुंना जामीन मंजूर केला. धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये ता. ६ मे २०१९ रोजी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, समाजसेवक किसनराव हुंडीवाले यांची विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल शंकर तायडे, मयूर गणेशलाल अहिर, दिनेश राजपूत (ठाकूर), प्रतीक दत्तात्रय तोंडे व मो.साबीर यांनी निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.