अकोला : गेल्या काही वर्षांपासून अकोल्यातील गुन्हेगारीचा क्रम वाढताच आहे. अकोल्यात टोळीयुद्धही भडकले आहे. आकाश वाकोडे याची पाच ते सहा जणांनी तलवार, चाकूने वार करून हत्या केली होती. टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचे आता पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना मुंबईतून अटक केली आहे.
अकोल्यात १२ मे २०२३ रोजी चिखलपुरा, न्यू तापडियानगर परिसरात सूडभावनेतून सुहास वाकोडे याचा भाऊ आकाश वाकोडे याची हत्या झाली होती. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी मुख्य तीन आरोपींना आज मुंबईतील उल्हासनगरातील एका फ्लॅटमधून अटक केली आहे. या हत्याकांडातील जवळपास आठ लोक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान दोघांमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई इतकी टोकाला गेली की तरुणांनी थेट धक्कादायक पाऊल उचलले. वर्चस्वाच्या वादातून मोठा घातपात होऊन दोन्ही गटात दोघांची हत्या तर दोघे जखमी झाले होते. वर्षभरापूर्वी विनोद वामन टोंबरेंवर (वय ३५, पंचशील नगर, खरप, अकोला) याची हल्ला करुन हत्या करण्यात आली. तर हल्ला करणारा मारेकरी सुहास वाकोडे हा देखील जखमी झाला होता. आता आरोपी सुहास वाकोडे याच्या भावाचा देखील कट रचून खून करण्यात आला.
वाकोडेच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर काही सामान पोहोचण्यासाठी आकाश मित्र गौरव मानकर याच्या बरोबरीने गेला. रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास घरी परतीच्या प्रवासावर असताना अचानक चिखलपुरा न्यू तापडिया नगर रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर चारचाकी वाहनातून तीन जण खाली उतरले, अन दोघांवर तलवारीने हल्ला चढवला. या घटनेत आकाश वाकोडे आणि गौरव मानकर हे गंभीर जखमी झाले. यामध्ये आकाश वाकोडे याचा जागीच मृत्यू झाला. गौरव गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रमोद ऊर्फ पिंटू टोबरे, गणेश लांडगे आणि अनिल इंगळे यांना अटक केली आहे. घटनेपासून तिघेही फरार होते आता सिव्हिल लाइनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांना तीनही आरोपी मुंबईत एका फ्लॅटवर दडून असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने मुंबईकडे पथक रवाना केले. पोलिसांनी मुंबई उल्हासनगरातील फ्लॅटमधून तिघांना अटक केली.