गडचिरोली : नक्षल शहीद सप्ताहादरम्यान घातपाती कारवाया करण्यासाठी गोळा करण्यात आलेला स्फोटकांचा मोठा साठा नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे. कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या कोटगुल हद्दीतील हेटळकसाच्या जंगलात हा साठा लपवून ठेवण्यात आला होता.
गडचिरोली पोलिसांच्या पथकांनी कोरची, टिपागड येथे पोलिसांवर हल्ला करण्यासाठी स्फोटके पेरून ठेवली होती. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वात अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या भागात अभियान राबविले. गडचिरोली पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे यंग प्लाटुन, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने हेटळकसा जंगलात शोध घेतला. शोध मोहिमेदरम्यान प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत पोलिसांना स्फोटके आढळली. यात दोन कुकर बॉम्ब, चार कार रिमोट, तीन वायरचे बंडल, आठ पाकिट डिस्टेंपर रंग, पिवळ्या रंगाचे एक किलो पावडर, राखाडी रंगाचे दोन किलो पावडर, पांढऱ्या रंगाचे एक पाव पावडर, ५० किलो पांढरे दाणेदार पदार्थ, नक्षल अभियानाशी संबंधित दोन पुस्तके आढळली. पोलिसांनी ही स्फोटके जंगलातच नष्ट केली.