अकोला : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून रिकाम्या हाती परतलेल्या नेत्यांचे सुरुवातीपासून अकोल्यातील विकासाकडे असलेले दुर्लक्ष कायमच आहे. मोठा गाजावाजा करीत उभारण्यात आलेला अकोल्याची उड्डाणपूल अनेक महिने झाले तरी शोभेची वस्तूच बनला आहे. तीन महिन्यांनंतरही हा पूल वाहतुकीसाठी खुला न झाल्याने नेते सुस्त आणि अकोलेकर त्रस्त अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
अशोक वाटिकाजवळील महानगराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी १९ डिसेंबर २०२२ रोजी फुटली होती. आयकर विभागाकडे जाणाऱ्या मार्गाशेजारील उड्डाण पुलाखालून जाणारी ही जलवाहिनी मोठ्या व्यासाची असल्यामुळे त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे पुलाच्या बांधकामाच्या भर्तीसाठी वापरलेली राख वाहून गेली होती. एखादा अपघात घडू नये म्हणून प्रशासनाने आयकर विभागाकडे जाणाऱ्या रस्त्याची तसेच उड्डाण पुलावरील वाहतूक बंद केली आहे. ती अद्यापही सुरू झालेली नाही. चार महिने होत आले, तरी रस्ता तसेच उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. रस्ता आणि उड्डाणपूल वाहातुकीसाठी सुरू होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.