Home » सरस्वती शिशुवाटिकेचा प्रथमदिनोत्सव संपन्न

सरस्वती शिशुवाटिकेचा प्रथमदिनोत्सव संपन्न

by नवस्वराज
0 comment

अकोला : शहरातील सर्वात जुनी शिक्षण संस्था लेडीज होम क्लास सोसायटी द्वारा संचालित तसेच विद्या भारती विदर्भ संलग्नित सरस्वती शिशुवाटिकेचा प्रथमदिनोत्सव मनुताई कन्या शाळेच्या परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर विद्या भारतीचे प्रांत अध्यक्ष राम देशमुख, रा.स्व.संघ अकोला विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, विद्या भारती विदर्भ प्रांत शिशुवाटिका प्रमुख निर्मला महाजन नागपुर, सिमा जोशी नागपुर, लेडीज होम क्लास सोसायटीच्या अध्यक्षा पल्लवी जोशी, सचिव विदुला चौधरी, संस्थेचे मार्गदर्शक अनिरुद्ध चौधरी, प्रकल्प प्रमुख दिप्ती गदाधर, विद्या भारतीच्या जेष्ठ कार्यकर्त्या तारा हातवळणे उपस्थित होत्या.

प्रथम दिनी शिशुवाटिकेत येणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचे कुंकुम तिलक लावून व कुंकुमाद्वारे बालकांच्या पायाचे ठसे घेऊन, सरस्वतीच्या प्रतिमेसमोर बालकांच्या हाताने ओम गिरवून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती वंदनाने झाली. माता बालकांच्या हस्ते अग्निहोत्र संस्कार करून घेण्यात आले. उद्घाटनाच्या भाषणात राम देशमुख, जळगाव जामोद यांनी विद्या भारतीची शिशुवाटिका इतरांपेक्षा वेगळी कशी आहे या बाबत माहिती दिली. भारतीय संस्कृती, परंपरा जपणारी, संस्कार करणारी असल्याचे उदाहरणाद्वारे पालकांना पटवून दिले. भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी शिक्षणपद्धतीत बदल होणे आवश्यक असून तो विद्याभारतीच्या माध्यमातून होऊ शकतो असे ते म्हणाले. पाल्यांसाठी सरस्वती शिशुवाटिकेची निवड केल्याबद्दल त्यांनी पालकांचे अभिनंदन केले. रा.स्व.संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे यांनी शिशुवाटिकेत पाल्यांना प्रवेश देणारे पालक भाग्यवान असल्याचे म्हणून पालकांचे कौतुक केले. शाळेचा पहिला दिवस असा असू शकतो हे मी प्रथमच बघीतले असे मत व्यक्त केलं. या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पालक स्वप्नील देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अखिल भारतीयस्तरावर कार्य करणार्‍या विद्या भारतीची शिशुवाटिका अकोल्यात सुरू झाली असून त्यात मुलांना प्रवेश मिळाल्या बद्दल समाधान व्यक्त केले. शिशुवाटिकेत संस्कारी, देशभक्त नागरिक तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अंजली अग्निहोत्री यांनी केले.

कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे विभाग प्रचारक दीपक बलमे, विद्या भारतीचे सचिन जोशी, समीर थोडगे, योगेश मल्लेकर, गिरीश कानडे, गिरीजा कानडे, आकांशा देशमुख, सिमा मुळे, आचार्या सुनिता देशमुख, भारती मराठे यांच्यासह आमंत्रित पाहुणे पालक तथा शिशु वर्ग उपस्थित होता. शांति मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!