मुंबई : आपल्या सत्ताकाळात महाविकास आघाडी सरकामधील काही मंत्र्यांमुळे अनेक अधिकारी रडकुंडीला आले. काही अधिकारी अडचणीत आले. परंतु राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपला विभाग सोडतासोडताही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रडविले. अर्थात हे सर्व ठाकूर यांच्या जाचामुळे नव्हे तर सत्तापालट झाल्यामुळे ठाकूर यांनी मंत्रालयातील कार्यालय सोडले त्यावेळी भावुक झाल्याने रडत होते.
मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला महिला व बालविकास विभागातील शिपायापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचा सत्कार. अनेकांचे डोळे पाणावले. pic.twitter.com/DNT1E8mwxq
— Navswaraj (@navswaraj) July 1, 2022
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तिवसा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर महिला व बालविकास मंत्री झाल्या. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ठाकूर यांचे मंत्रालयातील त्यांच्या विभागात कार्यरत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याशी एक वेगळे ‘बॉण्डिंग’ झाले.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मंत्रिमंडळ संपुष्टात आले. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनीही ईतर मंत्र्यांप्रमाणे मंत्रालयातील आपला कक्ष सोडला. मंत्रालय सोडण्यापूर्वी ठाकूर असे काही करून गेल्या की महिला व बालविकास विभागातील अनेकांचे डोळे पाणावले.
अगदी शिपायापासून तर सचिवापर्यंत प्रत्येकाचा यशोमती ठाकूर यांनी औक्षण करत शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रत्येकाचे आभार मानले. मंत्रालयात अचानक पार पडलेल्या या अनौपचारीक सोहळ्याने महिला व बालविकास विभाग भावुक झाला. काहींचे डोळे पाणावले तर काहींनी ठाकूर यांना नमस्कार करीत आशीर्वाद घेतले. ठाकूर यांच्या या वेगळेपणाची चर्चा राजकीय वर्तुळातही होती.