Home » Lok Sabha Election : राहुल गांधींची सभा नव्हे ‘फॅमेली गॅदरिंग’ 

Lok Sabha Election : राहुल गांधींची सभा नव्हे ‘फॅमेली गॅदरिंग’ 

Eknath Shinde : हद्दपार झालेले लोक मोदींना काय तडीपार करणार ?  

by नवस्वराज
0 comment

Mumbai : काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता 17 मार्च रोजी संध्याकाळी मुंबईत झालेल्या सभेने झाली. सभेला उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला अशी महाविकास आघाडीतील मोठी नेते मंडळी उपस्थित होती. त्यांनी भाषणांच्या माध्यमातून भाजपाप्रणीत राज्य सरकार व केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीका केली. या सभेबद्दल राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टिकास्त्र सोडले.

एकनाथ शिंदे म्हणाले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राहुल गांधींची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग होते. भानुमती का कुणबा, कहीं से इंटे, कहीं से रोडे अशी म्हण आहे. नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक सभेला हजर होते. उत्तर प्रदेश, बिहारमधून तडीपार, हद्दपार झालेले लोक तिथे आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की पकडून आणलेले लोक आहेत.

“सावरकरांची माफी मागायला हवी होती”

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना लक्ष्य केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व बाळासाहेबांच्या स्मारकासमोर राहुल गांधींची सभा झाली. ठाकरे गटाच्या लोकांनी आधी त्या समाधीवर जाऊन माफी मागायला हवी होती. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांबरोबर, सनातन धर्माचा अवमान करणाऱ्यांबरोबर तसेच फारूख अब्दुल्लांबरोबर बसावं लागतंय. त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

“काल उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सुरूवात ‘माझ्या तमाम हिंदू बांधव-भगिनींनो’या शब्दांनी झाली नाही. यावरून लक्षात आलं की बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांची भूमिका, धोरण हे सगळे त्यांनी गुंडाळून ठेवले आहेत. म्हणूनच आम्ही त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. अब की बार, तडीपार असं कालच्या सभेत दिसत होतं. इतर राज्यांतून तडीपार झालेले मंडळी मोदींना तडीपार कसं करू शकतात ? असा खोचक प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

हिंदू धर्माला संपवणारा जन्माला आलेला नाही

राहुल गांधींनी आपल्या भाषणात ‘हिंदू धर्माची शक्ती’ असा उल्लेख केला आहे. हिंदू धर्माची शक्ती, संपवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का? याचं उत्तर जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत देऊन त्यांची जागा दाखवेल. हिंदू धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही. एवढा मोठा राष्ट्रीय नेता, पण ठाण्यातल्या सभेला 500 लोकही नव्हते. मुंब्र्यात तर 4-5 लोकही नव्हते. सगळ्या गाड्याच होत्या. एक नेता तर गर्दी झाली नाही म्हणून, कुणालातरी मारतही होता. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते परंतू त्यांना 5 मिनीट भाषण करायला दिले. यावरून त्यांची पत लक्षात आली. आता त्यांच्याकडे आमदार, खासदार, शिवसेना नाही, त्यामुळे त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना वेळ दिला, असा घणाघाती टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!