अकोला : जिल्हा परिषद सदस्य तथा ठाकरे गटाचे नेते गोपाल दातकर यांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटल्यानंतर भाजप व ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गटाच्या आरोपांनंतर भाजपने आता जशास तसे उत्तर दिले जाईल असा ईशारा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्ताव पाठविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एका जिल्हा परिषद सदस्याला अपात्र करण्यासाठी दबाव आणणाऱ्या ‘फडतूस’ फडणवीसांना काय विचारणार अशी टीका आमदार देशमुख यांनी केली.
आमदार देशमुख यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार देशमुख यांची ‘मलाई’ बंद झाल्याने ते केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची वक्तव्य करीत असल्याचा प्रत्यारोप आमदार सावरकर यांनी केला. यापुढे आमदार नितीन देशमुख यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ढवळाढवळ करत नाही. कोणत्याही राजकीय द्वेषाने काम करत नाही, असे आमदार सावरकर यांनी स्पष्ट केले.
नेमके प्रकरण काय?
जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या हिंगणी बू. येथील शेतातून जाणाऱ्या रस्त्याबाबत गावातील एका व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवर तहसीलदारांनी पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेवून विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेचा प्रस्ताव पाठविला. २१ जुलैला पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी दुसऱ्याच दिवशी प्रस्ताव नियमाबाह्य असल्याचे कारण देवून जिल्हाधिकाऱ्यांकडे परत पाठविला. त्यानंतर २५ जुलैला विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला.