Home » अकोला झेडपीच्या सभेत ठाकरे गट, वंचित आमनेसामने

अकोला झेडपीच्या सभेत ठाकरे गट, वंचित आमनेसामने

by नवस्वराज
0 comment

अकोला : जिल्हा परिषदेची 155 एकर शेती अतिशय कमी दरात अंजली आंबेडकरांना भाडेकरारावर दिल्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठाकरे गट आणि वंचितच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे राज्यात ठाकरे गट आणि वंचित युतीबद्दल बोलत असताना अकोल्यात या दोन्ही पक्षात मात्र कलगीतुरा रंगला आहे.

गेल्या वर्षी 32 लाखांना भाडे करारावर दिलेली जिल्हा परिषदेची शेती यावेळी फक्त साडेतीन लाखांत वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकरांना देण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता अढाऊ यांनी विशेष अधिकाराअंतर्गत घेतला होता. ठाकरे गटासोबतच काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांनीही या निर्णयाला विरोध केला. हाता येथील शेत जमीन वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांना भाड्याने देण्यात आली होती. याप्रकरणी अपक्ष सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. या विषयावर होणारा विरोध बघता प्रा. अंजली आंबेडकरांनी स्वत:च जिल्हा परिषदेसोबतचा भाडेकरार रद्द केला. अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. याच जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली हाता येथील 155 एकर शेती कवडीमोल भावाने भाड्याने दिल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला.

बुधवार, २० सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. जिल्हा परिषदेत विरोधी बाकांवर असलेल्या शिवसेनेचा ठाकरे गट, काँग्रेस व अपक्ष सदस्यांनी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला कोंडीत पकडले. सरकारी भाव 18 लाख 49 हजार 100 रुपये असतानाही केवळ 3 लाख 70 हजार रुपयात शेती भाड्याने का देण्यात आली असा प्रश्न त्यांनी केला. यापूर्वी 9 लाख 50 हजार रुपयांची बोली बोलल्यानंतरही ती प्रक्रिया रद्द का करण्यात आली, असेही विरोधकांनी विचारले. यावर जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता आढाव यांनीच उत्तर द्यावे, असा आग्रहही विरोधकांनी धरला. अध्यक्षांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी यांना माहिती देण्यास सांगितले. आता या प्रकरणावर येणाऱ्या स्थायी समितीच्या सभेतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांनी उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे गटनेते गोपाल दातकर यांनी केली. त्यावेळी वंचितचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र यावर दातकर यांनी आक्षेप घेत अध्यक्षांनीच उत्तर द्यावे, असा आग्रह धरला. दातकर यांच्या मागणीला अपक्ष सदस्य गजानन पुंडकर, शिवसेनेचे सदस्य डॉ. प्रशांत आढाऊ, काँग्रेसचे चंद्रशेखर चिंचोळकर यांनी पाठिंबा दिला. अध्यक्षांची प्रकृती बरी नसल्याने अन्य सदस्य उत्तर देतील असे वंचितच्या सदस्या पुष्प इंगळे म्हणाल्या. प्रकृती बरी नसल्याची माहितीदेखील अध्यक्षांनीच द्यावी, असे दातकर म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष सुनिल पाटकर आणि गोपाल दातकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सभेतील सर्वच कामकाज नियमानुसारच होईल असा आग्रह विरोधकांनी लावुन धरला. यावर नियमापेक्षा आपण समन्वयाने कामकाज केल्यास सुरळीत होईल, असे वंचितचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी म्हटले. अखेर जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी निविदा प्रक्रियेची माहिती सभागृह सादर केल्यानंतर या वादावर तूर्तास पडदा पडला.

error: Content is protected !!