नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून पेटलेले रण अद्याप थांबलेले नाही. अशात माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी यांनी बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे? असा प्रश्न उपस्थित केलाय. विशेष म्हणजे यासदंर्भातील व्हिडीओ शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्याच अधिकृत व्हेरीफाईड ट्विटर हॅन्डलवरून पोस्ट केलाय. शिवानी यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी सावरकरविरोधी वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीमधील शिवसेना चांगलीच नाराज झाली होती. सावरकर यांच्या नातवाने राहुल गांधी यांच्यासंदर्भात कोर्टात केसही दाखल केली आहे. अशात सावरकरांना संबोधत बलात्काराचा विषयच शिवानी वडेट्टीवार यांनी जोडल्याने हा वाद आता भलत्याच वळणावर जातो की काय, असा पेच निर्माण झालाय. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपा आता यावर कोणती भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, शिवसेना-भाजप कधीच फुले – शाहू – आंबेडकर गौरव यात्रा काढणार नाही. ते फक्त सावरकरांचीच गौरव यात्रा काढतील, पण माझ्यासारख्या महिला भगिनीला त्यामुळे कसे सुरक्षित वाटेल? कारण सावरकरांनी आपल्या विरोधकांविरुद्ध बलात्कारासारख्या राजकीय हत्याराचा वापर करायचे आदेश दिले होते. एकीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी सहन करणार नाही असे, उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या भर सभेत जाहीर केले होते. मात्र, महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांकडून सावरकरांचा अपमान सुरूच आहे. यात राहुल गांधींच्या पुढे जात शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र डागले आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्याला आपण मानत नाही, हेच काँग्रेस नेते दाखवून देत आहेत. त्यामुळे ठाकरे काय भूमिका घेतात, हे औत्सुक्याचे असेल.
बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे ? pic.twitter.com/NAjdfowViC
— Shivani Wadettiwar (@SVW790) April 13, 2023