Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथ्यांदा यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत. अशात यवतमाळच्या भारी परिसरामध्ये मोदींची सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंत झालेल्या सभांमधील सर्वात मोठा सभा मंडप यवतमाळमध्ये उभारण्यात आला आहे. यवतमाळातील सभेच्या ठिकाणी खुर्च्यांवर राहुल गांधी यांचा फोटो असून स्कँन टू डोनेट असे या स्टिकर्सवर दिसून आले आहे.
काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात राहुल गांधी यांच्या सभेला या खुर्च्या वापरण्यात आल्या होत्या. त्याच खुर्च्या यवतमाळमधील सभेसाठी कंत्राटदाराने आणल्या आहेत. खुर्च्या आणताना राहुल गांधी याचे स्टिकर्स काढले नाही. प्रशासकीय वर्तुळातूनही याबाबत लक्ष देण्यात आलेले नाही. मोदी यांची सभा बुधवारी (ता. 28) होत आहे. सभेपूर्वी भारीच्या मैदानावर पोहोचलेल्या काही मंडळीना खुर्च्यांवर राहुल गांधी यांचा फोटो असल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली. विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळातील सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 2014, 2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यवतमाळात आले होते. आता 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळमध्ये सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.