अमरावती : मुंबई आणि अमरावती शहराला जोडणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचे स्लीपर डबे अचानक कमी करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने हा निर्णय घेत केवळ दोनच स्लीपर कोच अमरावती-मुंबई एक्स्प्रसेला लावल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.
सुमारे ६७० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत अमरावती-मुंबई एक्स्प्रेस विदर्भातील प्रवाशांना १३ तासात मुंबईला पोहोचविते. १३ थांबे असलेल्या या गाडीला आतापर्यंत एसीचे डबे कमी आणि स्लीपर क्लासचे डबे जास्त होते. मात्र अचानक मध्य रेल्वेने या गाडीच्या संरचनेत बदल केला आहे. स्लीपर क्लासचे केवळ दोनच डबे गाडीला ठेवण्यात आले आहेत. एस १ आणि एस २ हे दोनच डबे आल्याने गुरुवारी सायंकाळी प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. सुमारे २०० पर्यंत वेटिंग असलेल्या या एक्स्प्रेसच्या संरचनेत बदलाची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना चांगल्याच अडचणीचा सामना करावा लागला.
सामान्य शयनयान श्रेणीच नसल्यामुळे अमरावती, मूर्तीजापूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर येथुन प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना दोनच डब्यांमधुन प्रवास करावा लागला. परिणामी त्याचा मोठा फटका लहान बालके, महिला व ज्येष्ठ प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनशी यासंदर्भात संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळु शकले नाही.