नागपूर : उत्तर प्रदेशातील लखनौसह देशातील सहा आरएसएस कार्यालये बॉम्बने उडवून देण्याच्या संदेशाने लखनौ पोलिसांची झोप उडवली. डॉ. नीलकंठ मणी यांना हा संदेश पाठविण्यात आला होता. बनावट संदेशाचा हा प्रकार उत्तर प्रदेशात घडला असला, तरी नागपूर पोलिसांनीही महाल आणि रेशीमबाग परिसरात असलेल्या संघ मुख्यालयाची सुरक्षा अधिक कडक केली आहे.
काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी नागपुरातील संघ मुख्यालय परिसराची रेकी केली होती. हा दहशतवादी नंतर काश्मिरात पकडला गेला. त्यानंतर नागपुरात एनएसजी आणि ब्लॅककॅट कमांडोजनी रंगीत तालीम केली होती. या मुद्द्यावर राष्ट्रीय सुरक्षा संस्था शोध घेत असतानाच अलीगंज येथील आरएसएसचे कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली गेली. मेसेज मिळताच नीलकंठ यांनी लखनौ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर लखनऊ पोलिसांनी तात्काळ कार्यालयाची सुरक्षा वाढवली आणि पत्र लिहून इतर पाच कार्यालयांना कळवले. मात्र, स्फोट न झाल्याने अज्ञात अराजक घटकांवर गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.