अमरावती : जिल्ह्यात दोन खासदार असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत उदासीनता दिसत असल्याची खंत भाजपचे नेते किरण पातुरकर यांनी व्यक्त केली. या उदासीनतेचा फटका अमरावती आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना बसत असल्याचे ते म्हणाले.
अमरावती येथे भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे खासदार आहेत. नवनीत राणा यादेखील लोकसभेमध्ये अमरावतीचे प्रतिनिधित्व करतात. दोन खासदार असतानाही अमरावती जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मिळू नये म्हणजे अजब प्रकार असल्याचे पातुरकर म्हणाले. भाजपच्या नेत्याने ही खंत व्यक्त केल्यामुळे भाजपला घरचा आहेर भेटला आहे. अमरावतीला वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे अमरावतीकरांचे 35 वर्ष जुने स्वप्न आहे. त्याकरिता लागणार्या जागेचे अधिग्रहण झाले असून वैद्यकीय विभागाला हस्तांतरित झाली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी या आधीचे सरकार आणि आताच्या सरकारने सुद्धा कुठलेच प्रयत्न केले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासनाने १५ जून रोजी मान्यता दिली आहे. नागपूरचे डॉ. संजय पराते यांच्या अध्यक्षतेत शासनाने चार तज्ज्ञांची समिती अमरावतीत आली होती. या समितीने 3 ठिकाणांची पाहणी केली असून सकारात्मक अहवाल तयार केला होता. अमरावतीच्या शासकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थांना प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु त्यानंतरही वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण झाले नाही, असे पातुरकर म्हणाले.