मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धोबीपछाड देत भाजपने यश संपादन केले आहे. या निवडणुकीत भाजपची सरशी झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीतील वजन आणखी वाढले आहे.
राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीची पहिल्या पसंतीची ४३ मते मिळवून गोंदियाचे नेते प्रफुल पटेल यांचा विजय झाला. काँग्रेसने त्यांच्या ४२ च्या कोट्यापेक्षा २ मते जास्त इम्रान प्रतापगढी यांना दिल्याने ते विजयी झाले. भाजपने पहिल्या पसंतीची ४८ मते दिल्याने माजी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल विजयी झाले. तितकीच मते अमरावतीचे भाजप नेते तथा राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना मिळाली.
शिवसेनेच्या ४२ आमदारांनी त्यांच्या पहिल्या पसंतीचे मत संजय राऊत यांना दिल्याने राऊत विजयी झाले. भाजपच्या मतांसह ८ अपक्ष आमदारांनी महाडिक यांना मतदान केले. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या लढतीत महाडिक यांनी संजय पवार यांचा पराभव केला. निवडणुका फक्त लढण्यासाठी नाही तर विजयासाठी लढवल्या जातात. जय महाराष्ट्र, असे ट्विट भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी केले, राज्यसभेसाठी सर्वसंमतीने उमेदवार देण्यास नकार दिल्याने राज्यात २४ वर्षांनंतर निवडणुका झाल्या, असे ते म्हणाले.