Home » Nagpur Crime : पोलिस ठाण्यातच कर्मचारी मरता मरता वाचला

Nagpur Crime : पोलिस ठाण्यातच कर्मचारी मरता मरता वाचला

Police Action : उपमुख्यमंत्र्यांच्या गृह शहरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ

by admin
0 comment

Nagpur : नागपुरातील कपिलनगर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस आयुक्तांच्या वाहन चालकावर कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात घडलेल्या या घटनेमुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या वाहनावर चालक असलेले प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे (वय 42, रा. नेमसेडा, चांदुरबाजार, अमरावती) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते अगोदर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. प्रफुल्ल धर्माळे यांनी 15 मार्च रोजी सकाळी सहाय्यक पोलिस आयुक्तांना कपिलनगर पोलिस ठाण्यात सोडले. त्यानंतर ते पोलिस ठाण्याच्या आवारात गाडी साफ करत असताना, दिलीप रामराव चिनकुरे (वय 53, रा. एनआयटी क्वॉर्टर, कपिलनगर) हा तेथे पोहोचला. त्याने धर्माळे यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केले. त्यात धर्माळे जखमी झालेत. दिलीपने केलेला तिसरा वार धर्माळे यांनी चुकवला व आरोपीला जोरात धक्का दिला. जखमी धर्माळे यांनी आरडाओरड केल्यावर पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडले.

जखमी प्रफुल्ल धर्माळे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धर्माळे यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिस ठाण्यात दिलीप चिनकुरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मानसिक रुग्ण असल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आली असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात नेण्यात आले. पोलिस स्टेशनमधील हल्ल्याच्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!