अमरावती : बडनेरा मतदार संघाचे आमदार व युवा स्वाभीमान पक्षाचे सर्वेसर्वा रवी राणा यांच्यावर अंजनगावसुर्जी येथे दहीहंडी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करीतत असताना प्राणघातक हल्ला झाला. राणा यांचे माध्यम समन्वय अजय बोबडे, शुभम उंबरकर यांनी या घटनेला दुजोरा दिला.
आमदार रवी राणा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना धमक्या मिळत होत्या. मात्र सोमवारी आमदार राणा यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर अमरावती जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा दाम्पत्याने अमरावतीत भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राणा दाम्पत्याने नेहमीप्रमाणे आपले बळ दाखवून दिले.
अंजनगाव सुर्जी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेची पाहणी करत असताना त्या ठिकाणी आठ ते दहा हल्लेखोरांनी आमदार राणा यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रवी राणा यात थोडक्यात बचावले असून त्यांना कुठलीही इजा झालेली नाही.
राज्यात मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमरावती शहर पोलिसांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मराठा मोर्चासह उद्धव ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांवर पोलिस लक्ष ठेऊन होते. नेत्यांना कोणतेही आंदोलन करू नका अशी विनंती करणारे पोलिसांचे फोनही गेले. फडणवीस यांचा अमरावती दौरा शांततेत पार पडला. मात्र त्यानंतर आमदार राणा यांना एका हल्लेखोराने लक्ष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अवलोकन करीत असताना आमदार राणा यांच्यावर हल्ल्याचा हा प्रयत्न झाला. हल्ला करणाऱ्यास राणा समर्थकांनी पकडून चोपही दिला.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. परंतु राणा यांच्यावरील हल्ल्याच्या या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपल्यावरील हल्ल्याला आमदार राणा यांनी उद्धव ठाकरे गट जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्याने त्यांना टार्गेट केले होते. ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्याने आपल्या समर्थकांसह हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उद्धव ठाकरे सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पोलिसांनी आपल्यावर कसा अन्याय केला हे आमदार राणा यांनी राज्य विधानसभेत तर खासदार नवनीत राणा यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणुन दिले होते.
महाविकास आघाडी सरकारचे पतन झाल्यानंतरही राणा दाम्पत्याने ठाकरे गटावर टीका कायम ठेवली आहे. त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील ठाकरे समर्थक राणांवर चिडून आहेत. अशात आमदार राणा यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे त्यांना ठाकरे गटावर पुन्हा राजकीय हल्ला करण्याची संधी मिळाली आहे. आमदार राणा यांच्यावरील हल्ला व खासदार राणा यांना मिळालेल्या धमकीचा अमरावती पोलिस कसून तपास करीत आहे. अमरावतीच्या ठाकरे गटाने राणांवरील हल्लाचे सर्व आरोप फेटाळले आहे. उलट यावेळी राणा यांच्याकडुनच उद्धव ठाकरेंवर जहरी वक्तव्य करण्यात आले व वादाला सुरुवात करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल खराटे म्हणाले की, दहीहंडी कार्यक्रमादरम्यान आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना हटकले. त्यावेळी महेंद्र दिपटे नामक कार्यकर्त्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या घटनांमुळे राणा विरुद्ध ठाकरे हा राजकीय संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.