अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस परिसरातील बाबुजी महाराज मंदिरात सायंकाळची आरती सुरू असताना टिनशेडवर एक जुने झाड कोसळले. या टिनशेडखाली ५० भाविक दबले असून त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अकोल्यावरून बचाव दल पारसमध्ये दाखल झाले आहे. अमरावती विभागीय आयुक्तांनाही अकोल्याकडे रवाना होण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास मंदिरात आरती सुरू होती. त्यावेळी वादळी पावसाला सुरुवात झाली. अशात मंदिराला लागुन असलेले जुने झाड उन्मळुन टिनशेडवर कोसळले. त्यामुळे टिनशेडखाली आरतीसाठी जमलेले सुमारे ५० भाविक दबले. अंधार असल्याने धावाधाव आणि आरडाओरड सुरू झाला. काही कळण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू या घटनेत झाला होता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बचाव कार्याला वेगाने सुरुवात झाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रणधीर सावरकर, बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झालेत. अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरून सावरकर यांनी घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा पारमध्ये दाखल झाला. जखमींना अकोला येथे उपचार शक्य नसल्यास तातडीने नागपूरकडे हलविण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले.
या घटनेची माहिती मिळताच अमरावतीवरून विभागीय आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील अकोल्याकडे रवाना झाले आहेत. पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने ३३ गावांना फटका बसला आहे. युद्धस्तरावर हे काम हाती घेण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिलेत.
भाविकांची होती मोठी गर्दी
बाबुजी महाराज संस्थान परिसरात पश्चिम विदर्भातून रविवारच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. आजही ही गर्दी होती. परंतु काळाने भाविकांवर घाला घातला.