Amravati | Yavatmal : अमरावतीवरून यवतमाळला क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या मिनी बसचा आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रविवारी १८ रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर जवळ झाला. या अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबरते, संदेश पाडर या चार जणांचा मृत्यू झालाय. ते अमरावतीचे रहिवासी आहेत. रुक्मिणी नगर आणि रवी नगर येथील असणारे 15 तरुण क्रिकेटपटू हे यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट सामन्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल्सने निघाले होते.
दहा गंभीर जखमी
अपघातातील जखमी तरूणांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहे.
स्पर्धेला पोहोचण्यापूर्वीच अनर्थ
अमरावती जिल्ह्यातून हे खेळाडू क्रिकेट स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यात निघाले होते. मात्र, स्पर्धेपूर्वीचं या खेळाडूंवर काळाने घाला घातला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झालेले आहेत. रेडी मिक्स काँक्रिट मिक्सरच्या धडकेनं हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.