अमरावती : उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेमुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेची (अॅकॅडमीक कौन्सिल) निवडणूक आता सप्टेंबर अखेर होण्याची चिन्हे आहेत. वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांच्या वैधतेचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेल्याने ही निवडणूक बैठक लांबणीवर पडली आहे.
विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर (मॅनेजमेंट कौन्सिल) दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ७ सप्टेंबरला निवडणूक बैठक होणार होती. परंतु अशात वनस्पतीशास्त्र विभागातील अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. अभ्यास मंडळ निवडणुकीत या पदावर नुटाचे प्रशांत गावंडे ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले होते. अध्यक्ष या नात्याने त्यांनी काही बैठकीही संचालित केल्या. त्यानंतर पराभूत उमेदवार शिक्षण मंचचे दिनेश खेडकर यांनी कुलगुरुंकडे अपिल दाखल केले. अपिलात ईश्वर चिठ्ठीचा निकाल फिरविण्यात आला. कुलगुरूंच्या या निकालाला प्रशांत गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.
विद्यापीठात विविध विद्याशाखांचे (फॅकल्टी) अभ्यास मंडळ असतात. या अभ्यास मंडळांचे अध्यक्ष हे विद्वत्त परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. या सदस्यांमध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांचाही समावेश आहे. परंतु अध्यक्षपदाच्या निवडीवरूनच वाद सुरू असल्याने व हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाला निवडणूक पुढे ढकलावी लागली आहे. अध्यक्ष पदावरून कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीची पुढील तारीख २७ सप्टेंबर आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेर किंवा त्यानंतरच निवडणुकीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.